उमरी कुसुमनगर-वाघलवाडा येथील एम.व्ही.के. ऍग्रो फूड प्रॉडक्ट लिमिटेडच्या सहाव्या गाळप हंगामाचा, तसेच डॉ. शंकरराव चव्हाण जागरी गुळ पावडर कारखान्याचा चौथ्या गाळप हंगामाचा शुभारंभ शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला असून बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजनाच्या विधीने नव्या गाळप हंगामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या वेळी व्ही.पी.के. उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव व्यंकटराव पा. कवळे गुरुजी यांनी शेतकरी हिताच्या विविध योजनांची घोषणा करत दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संस्थात्मक पातळीवर मदतीचा हात देण्याचा संकल्प व्यक्त केला.
संत-महंतांच्या शुभाशीर्वादाने पार पडलेल्या या सोहळ्यास प.पू.प.म. श्री. श्री. श्री. १००८ महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज, प.पू. श्री. आनंदपुरी गुरु दत्तपुरी महाराज तसेच प.पू. श्री. बामेराज बाबा कपाटे यांची उपस्थिती होती. दुपारी १२.१० वाजता बॉयलर अग्निप्रदीपन व पूजाविधी, त्यानंतर गव्हाण पूजन करण्यात आले.
बॉयलर अग्निप्रदीपनाचा मान प्रगतशील शेतकरी मारोती शेषेराव पा. कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी (बाभळी, ता. धर्माबाद) तसेच साईनाथ दशरथ पा. ढगे व त्यांच्या सुविद्य पत्नी (हिरडगाव, ता. उमरी) यांना देण्यात आला. तर गव्हाण पूजनाचा मान प्रगतशील शेतकरी अमृतराव शिवाजी पा. डोईफोडे (इज्जतगाव, ता. नायगाव) तसेच बाबुराव शंकरराव पा. शिंदे (बोळसा, ता. उमरी) यांना देण्यात आला.
यावेळी बोलताना मारोतराव कवळे गुरुजी यांनी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा विशेष उल्लेख केला. त्याचबरोबर कारखान्याचे सभासद व शेअर्सधारक असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाच्या गाळप हंगामात एक टन उसाला ३१०० रुपये दर जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याशी सभासद म्हणून जोडलेल्या शेतकऱ्यांना या दरवाढीचा थेट लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप कारखान्याचे शेअर्स घेतलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कारखान्याचे शेअर्सधारक होऊन सभासदत्व स्वीकारावे आणि उपलब्ध होणाऱ्या दरवाढीच्या लाभाचा फायदा घ्यावा, असे आवाहनही कवळे गुरुजी यांनी आपल्या भाषणातून केले.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाई, सिंचनाची समस्या आणि उत्पादनातील घट अशा विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचा मनोदय कवळे गुरुजी यांनी व्यक्त केला.
दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे कर्ज शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून अध्यक्ष व सचिव यांच्या परवानगीने देण्यात येणार असून, या निधीचा उपयोग शेततळे, सिंचन विहीर, जलसंधारणाच्या उपाययोजना तसेच ऊस पिकासाठी ठिबक सिंचन उभारण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के व्याजमाफी देण्याची तरतूद करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर अथवा बोअरवेल उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या योजना व्ही.पी.के. पतसंस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून, संबंधित शेतकरी एम.व्ही.के. अथवा व्ही.पी.के. कारखान्याचा शेअर्सधारक असणे आवश्यक असल्याचे कवळे गुरुजी यांनी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करताना कवळे गुरुजी यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस इतरत्र न देता कारखान्याला देण्याचे आवाहन केले. “हा केवळ कारखाना नाही, तर शेतकऱ्यांची कामधेनू आहे. या कामधेनूवर माझ्यापेक्षा तुमचा अधिक अधिकार आहे,” असे सांगत त्यांनी कारखाना आणि शेतकरी यांच्यातील नाते अधोरेखित केले.
ऊस तोलणीबाबतही त्यांनी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. “शेतकऱ्यांनी केवळ कारखान्यावर विश्वास ठेवून न राहता, आपला ऊस कोणत्याही काट्यावर तपासून आणावा,” असे स्पष्ट सांगत त्यांनी ऊस तोलणीतील पारदर्शकतेवर भर दिला. शेतकऱ्यांचा विश्वास हीच कारखान्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
एम.व्ही.के. ऍग्रोचा सहावा आणि डॉ. शंकरराव चव्हाण जागरी गुळ पावडर कारखान्याचा चौथा गाळप हंगाम सुरू झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गाळप हंगाम आव्हानात्मक असला तरी कारखाना व्यवस्थापनाने शेतकरीहिताच्या विविध योजनांवर भर देण्याचा व्यक्त केला.
यावेळी साधुसंत म्हणून आनंदपुरी महाराज चोळाखा, बामेराज बाबा कपाटे बिजेगाव,शिवाचार्य महाराज, नागठाणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच प्रमुख पदाधिकारी व मान्यवर म्हणून वाघालवाडा कारखान्याचे सीईओ संदीप पाटील कवळे,ज्येष्ठ मार्गदर्शक नागोराव पाटील रोशनगावकर, माजी नगराध्यक्ष संजयजी कुलकर्णी, व्हीपीके पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन माधवराव पाटील बोडके, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विक्रम देशमुख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, कुंडलवाडी मार्केट कमिटीचे माजी सभापती बाबाराव पाटील भांगे, व्हीपीके पतसंस्थेचे संचालक महादेव पटणे सर, पतसंस्थेचे संचालक अनिलजी दर्डा,संचालक प्रभाकर पाटील पुयड, गणेशराव पाटील सरसे बाबुरावजी अडकिने कुंटूरकर, रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष पारस शेठ दर्डा, प्रतिष्ठित व्यापारी नर्सिंग अप्पा मुक्कावार, किरण असोसिएशनचे विठ्ठलअप्पा मुक्कावार, माजी नगराध्यक्ष श्रीनिवास अनंतवार, आयएस कृषी केंद्राचे प्रमुख वसंतराव गुरवे, रामेश्वर पाटील कुदळेकर, देवराव पाटील हासेकर, गणपतराव पाटील हासेकर, पांडुरंग पाटील वाघलवाडेकर, प्रशांत पाटील ढोणे, हनुमंतराव पाटील कोळगावकर, शिवाजी पाटील कामळजकर साहेबराव पाटील वाडीकर, रावसाहेब पाटील बोरजणीकर, वाघालवाडा सरपंच शेख सादक, नागनाथ पाटील बनाळीकर, साईनाथ सेट कोंडलवाडी,विलास पाटील नरवाडे, पंजाबराव पाटील पवळे, आगरवाडा कारखान्याचे जनरल मॅनेजर अंबडवार साहेब, चीफ इंजिनियर येडाळे साहेब यांच्यासह कारखान्याचे सर्व ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, शेतकरी, सभासद व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले.

0 Comments