Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी शेती पिकांना जीवनदान, शेतकऱ्यासह नागरिकांनी आवश्यक कामासाठी बाहेर पडावे महसूल प्रशासनाचे आवाहन

नागोराव शिदे पळसपुरकर 
हिमायतनगर.   -शहरासह संपूर्ण तालुक्यात बुधवार (दि. 29 जुलै) मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच इतर पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी या पावसाचे स्वागत करत शेती पिकांना अक्षरशः जीवनदान मिळाल्याची भावना व्यक्त केली.तालुक्यात सकाळ पासूनच मुसळधार पावसामुळे हजेरी लावली त्यामुळे अनेक लहान-मोठे नाले, ओढे आणि पाणवठे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी नदी-नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आवश्यक नसल्यास पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच लहान मुले आणि जनावरे नदी-नाल्यांच्या परिसरात जाऊ देऊ नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.एकीकडे पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असताना दुसरीकडे हिमायतनगर शहरातील नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात करण्यात आलेल्या नाल्यांच्या साफसफाईच्या दाव्यांची मुसळधार पावसानेच पोलखोल केली आहे. शहरातील जनता कॉलनी परिसरा सह सराफा लाईन, मंदिर परिसर व अनेक भागांमध्ये नाल्यांतील साचलेले घाण पाणी थेट रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे.विशेष म्हणजे, शहरातील अनेक नाल्यांची वेळेवर साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून जाऊ शकले नाही. परिणामी सांडपाणी आणि घाण रस्त्यावर साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार, पादचारी आणि व्यापाऱ्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यांवर साचलेल्या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने नाल्यांची स्वच्छता करावी, रस्त्यांवरील साचलेले घाण पाणी हटवावे आणि स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. पावसामुळे शेतीला संजीवनी मिळाली असली तरी शहरातील अस्वच्छता आणि अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ विकासाच्या घोषणा न करता प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments