Header Ads Widget

गुरुजी फाउंडेशनतर्फे कोल्हापुरी माती बंधाऱ्याचे भूमिपूजन; आमदार राजेश पवार यांच्या हस्ते शुभारंभ..

       माधव पवार 
शिवजयंतीचे औचित्य साधत गुरुजी फाउंडेशनच्या वतीने कारेगाव ते हरेगाव दरम्यानच्या नाल्यात उभारण्यात येणाऱ्या कोल्हापुरी माती बंधाऱ्याचे भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
शेतकऱ्यांच्या सिंचन व पाणीटंचाईच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने “एक हात मदतीचा, प्रत्येकाच्या उन्नतीचा” या ब्रीदवाक्याखाली फाउंडेशनकडून विविध विकासकामे राबविली जात आहेत. त्याच अनुषंगाने या कोल्हापुरी माती बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार राजेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी उद्योजक व शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी होते.
कार्यक्रमास राजेंद्र कंधारे (प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई), स्वाती दाभाडे (उपविभागीय अधिकारी, धर्माबाद), सुरेखा स्वामी (तहसीलदार, धर्माबाद), युवा उद्योजक संदीप पाटील कवळे, माजी सभापती दत्ताहरी पाटील चोळाखेकर, ज्येष्ठ नेते नागोराव पाटील रोशनगावकर, माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार, डॉ. विक्रम देशमुख, पारसमल दर्डा, प्रभाकर पाटील पुयड, किशनदादा गायकवाड कुदळेकर (प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्रदेश), बापुसाहेब येताळे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा नांदेड), अमोल ढगे (जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी, भाजपा नांदेड), ज्ञानेश्वर सावंत (तालुका अध्यक्ष, भाजपा उमरी) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रास्ताविक भाषणात गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा व्हि,पी, के, उद्योग समूहाचे सी,ई,ओ संदीप पाटील कवळे यांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमाचा लेखाजोखा सुस्पष्ट शब्दात सांगितला आहे 

कार्यक्रमात बोलताना प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय राजेंद्र कंधारे यांनी सर्व कामे शासकीय नियम व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच पुढे नेण्यात येतील, असे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात मारोतराव पाटील कवळे यांनी मागील तीन वर्षांपासून फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या नालासरळीकरण व कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांचा आढावा घेतला. दरवर्षी पावसाळ्यात मातीचे बंधारे वाहून जात असल्याने शासनस्तरावर मजबूत व कायमस्वरूपी कोल्हापुरी बंधारे उभारावेत, अशी मागणी त्यांनी आमदार राजेश पवार साहेब यांच्या कडे केली आहे 

तसेच गोदावरी नदीच्या दोन्ही काठांवर वीजपुरवठ्याची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांना मोटारी बसवून सिंचनासाठी पाणी उपसा करता येईल, विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी वाढेल आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल, असे त्यांनी नमूद केले. गेली वीस वर्षे प्रलंबित असलेल्या उर्ध्व पैनगंगा कालव्याचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे 

उद्घाटनपर भाषणात आमदार राजेश पवार यांनी गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. उर्वरित प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत लाईट व्यवस्था, कालव्याचे उर्वरित काम आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी सर्वेक्षण करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले आहे 

यापुढे शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, तिन्ही तालुक्यांतील पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे 

या भूमिपूजन सोहळ्यामुळे धर्माबाद परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, सिंचन व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments