गोदावरी नदीच्या किनारी वसलेलं नांदेड हे शहर सचखंड गुरूद्वारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.दरवर्षी जगभरातून नांदेड येथे लाखो श्रद्धाळू भक्त येतात व गुरूद्वारात गुरू गोविंदसिंहजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन स्वतःस धन्य समजतात.लोकनेते शंकरराव चव्हाण व थोर विचारवंत नरहर कुरूंदकर यांचा समृद्ध तथा वैचारिक वारसा नांदेड शहरास लाभला आहे.
गुणवतेत अग्रणी असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामुळे नांदेडचे नाव शैक्षणिक क्षेत्रात ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
आजच्या मितीस शैक्षणिक गुणवत्तेत नांदेड हे शहर अग्रस्थानी आहे.अकरावी व बारावीचे शिक्षण घेण्यासाठी तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी नांदेड येथे राज्यभरातून दरवर्षी हजारो मुलेमुली येतात.नांदेड व परिसरातील मूळ रहिवासी तसेच नांदेड येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व त्यांचे पालक यामुळे शहराची लोकसंख्या अमर्याद वाढत आहे.
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाच्या घरी जितकी माणसे तितकीच वाहनांची संख्या झाली आहे
शिक्षणासाठी बाहेरून येणा-या विद्यार्थ्यांच्या वाहनांमुळे नांदेड येथील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
दुचाकी व चारचाकी वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे शहरातील प्रत्येक गल्ली,रस्ता व चौक चोवीस तास गजबजलेला असतो.
अल्पवयीन मुलेमुलीही बेफाम वेगाने वाहने चालवितात.त्यामुळे लहान बालके,दिव्यांग व्यक्ती,महिला व ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते.
धोकादायक पद्धतीने वाहन चालवणा-या हजारो मुलामुलींकडे वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना आहे किंवा नाही हेही जबाबदार यंत्रणेने तपासणे आवश्यक आहे.
नांदेडच्या महानगर पालिकेने वाहन पार्किंगसाठी ज्या जागा निश्चित केल्या आहेत तेथे कसल्याही प्रकारची मार्किंग केलेली नाही किंवा फलकही लावले नाहीत.नांदेड येथे बहुतांश ठिकाणी बेशिस्तीने वाहने पार्क केली जात असल्यामुळे येथील पादचा-यांना होणारा त्रास शब्दातीत आहे.
नांदेड येथील वाहनांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या खूप कमी असल्याचे दिसून येते.बेलगाम वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस यंत्रणेने स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली तर त्यांचे काम थोडे का होईना सुलभ होईल असे वाटते.
नुकत्याच पुणे व नागपूर येथे घडलेल्या हिट अँड रनसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, प्रचंड वेगाने वाहने चालविणा-या मुलामुलींना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास भाग पाडले तसेच नियमभंग
करणा-यांना कठोर शिक्षा केली तरच आम्हा नांदेड वासियांना शहरातील रस्त्यांवरून निर्धास्तपणे फेरफटका मारण्याचा आनंद उपभोगता येईल.
लातूरचे योगिराज माने यांनी त्यांच्या गझलेत लिहिले आहे की,जे हवे ते सर्वकाही मिळत नाही .
नेमके हे माणसाला कळत नाही...
वेग आटोक्यात नाही ठेवला तर..
त्याक्षणी अपघात होतो टळत नाही ..
हा मूलमंत्र आजच्या काळात,बेफाम वेगावर स्वार झालेल्या तरूणाईने ध्यानात ठेवला तर दररोज होणा-या अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल हे मात्र नक्की..
भाऊराव पुंडलिकराव कानोले
मुख्याध्यापक
जि.प.प्रशाला,सावरखेडा
ता.नायगाव जि.नांदेड
मो.९४२०४१४२९६

0 Comments