Header Ads Widget

नरंगल येथील पाच ग्रा. पं. सदस्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा,नरंगल ग्रा.प.ची पोट निवडणूक रद्द तर लालवंडी ग्रा.प.व टाकळी त.ब.निवडणूक होणारच


विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे - 

नायगाव तालुक्यातील - नरंगल येथील ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरु असलेल्या सुनावणीत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाले होते. पण उच्च न्याययालयात या प्रकरणी सुनावणी होऊन न्या. पेंढेकर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्याने या पाचही  सदस्यांना दिलासा मिळाला आहे.
नरंगल ग्रामपंचायतीवर माजी सरपंच श्रीहरी देशमुख यांची सत्ता आहे. त्यांच्या गटातील सुरेखा दाजीराव वडजे, ललिता राजू देशमुख, विठ्ठल पंडितराव वटंबे,लक्ष्मीबाई चांदू वाघमारे, उपसरपंच प्रकाश रमेश वाघमारे या पाच सदस्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे याप्रकाराची चौकशी करून सदस्यत्व रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. 

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी नायगाव पंचायत समिती या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.. चौकशी अहवालाधारे जिल्हाधिकारी यांनी पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णया विरूद्ध औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयात अॅड. अनिल गायकवाड यांनी चौकशी मध्ये अन्याय झाला असे सांगितले
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदर प्रकरण पुन्हा जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे पाठविले. यामुळे सध्या तरी नरंगल येथील पाच सदस्यांना दिलासा मिळाला.

निवडणूक रद्द झाल्याने राजकीय मोर्चे बांधणी थंडावली
नरंगल ग्रा.प.सदस्य यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने येथील पाच जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. १६ अक्टोंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली होती.

गावात राजकीय आराखडे बांधले जात होते.पॅनाल प्रमुख श्रीहरी देशमुख यांनी या मध्ये पुढाकार घेत दरम्यान हे प्रकरण न्याय प्रविष्ट केले.उच्च न्यायालयाच्या या निर्णया मुळे सदर निवडणूक थांबली आहे असे  नायगाव निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.या मुळे गावात बांधलेले मनसुबे या वर पाणी फेरले आहे.

लालवंडी ग्रा.प.मध्ये सार्वत्रिक तर टाकळी त.ब.येथे एका जागे साठी निवडणूक - 

नायगाव तालुक्यातील लालवंडी ग्रा.प.मध्ये सरपंच पद व पूर्ण जागे करिता निवडणूक लागली असून सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तर टाकळी त.ब.येथे एका जागे साठी निवडणूक होत असून तहसीलदार मंजुषा भगत यांच्या अधिपत्य खाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प.स.विस्तार अधिकारी महेश मुखेडकर हे काम पहात आहेत.

Post a Comment

0 Comments