अशा बक्तिमत्वाचा दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी वाढदिवस असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने कोनापुरे साहेबाना खूप खूप शुभेच्छा !! 🌹-
प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत स्वत:ची ओळख निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव कोनापूरे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत उमरदरीच्या जि.प.प्राथमिक शाळेत चौथी पर्यंतचं शिक्षण घेतलं. माध्यमिक शिक्षणसाठी हुतात्मा माधव विद्यालयात प्रवेश घेतला. वडिल मुनीमकीच्या माध्यमातून प्रपंच ओढत होते. मुलानं शिकावं, मोठं व्हावं. हे प्रत्यक बापाचं स्वप्न असतं. मात्र संसाराच्या ओढाताणीत शिवाजी या मुलाकडं म्हणावं तेवढं लक्ष द्यायला वेळ होताच कुठे ?
शिवाजीचं घोडं मात्र दहावीत अडलं ते पुरतं पाच वर्षासाठी. मुलगा शिकला नाही तरी हरकत नाही. त्यानं कौशल्यवान व्हावं ही मनिषा बाळगून शिवाजीला 'भारत प्रिंटींग प्रेस' मध्ये छपाई तंत्र शिकण्यासाठी पाठवण्यात आलं.
दरम्यान शिवाजीचे दोनाचे चार हात झालेले. प्रेसवर संघ विचारांचा प्रभाव असणारी माणसं यायची. त्या काळात म्हणजे नुकतीच आणीबाणी संपलेला काळ. आणीबाणीच्या काळातल्या दमनशाहीला धीटपणाने सामोरे गेलेल्या तत्कालीन जनसंघाच्या कार्यावर आधारित चंद्रशेखर वाघ लिखित 'ही जुलुमावर धीट चढाई' हे पुस्तक वाचून संघ विचाराशी जुळलेल्या शिवाजीरावांच्या जीवनात विलक्षण बदल झाला. शिक्षणाचे जीवनातले महत्व अधोरेखित झाले.
त्यावेळची अक्षर ठोकळ्यांची जुळणीची मुदणकला आत्मसात केलेला तरुण लग्नानंतर शिक्षणाकडे आकर्षिल्या गेला. अकरावीला प्रवेश घेवून अर्धवेळ मुद्रणालयात नौकरी चालूच होती. चळवळ संघटनही शांत बसू देत नव्हते. माणूस ध्येयानं झपाटला की साध्य हासिल होईतो थांबत नसतो. 'दहावीला नापास झालेला मुलगा बारावीला कॉपी न करता पास होतो'
याचा दाखला म्हणजे शिवाजीराव कोनापूरे ! सलग पाच वर्षे महाविद्यालय प्रतिनिधीत्वाची जबाबदारी सांभाळत त्याच महाविद्यालयाचे संस्थापक सदस्य असणारे स्वा.सेनानी शिवसांबआप्पा बेटमोगरेकरांच्या सिध्देश्वर प्रिंटींग प्रेस मध्ये अर्धवेळ नोकरी करीत कलास्नातक पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात दै.गोदातीर समाचारच्या युवा सदरातून अभिव्यक्तीची संधी मिळत गेली. पुढे हीच अभिव्यक्ती पत्रकारितेत रुपांतरीत झाली. तेंव्हा पासून आजतागायत दै. प्रजावाणीचे वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत.
दै.प्रजावाणी सोबतच दैशोन्नती, आपलं महानगर, लोकपत्र, देवगिरी तरुण या दैनिकांसाठीही त्यांनी बातमीदार म्हणून कार्य केले आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबत मुद्रणालयात केलेल्या अर्धवेळ नोकरीच्या अनुभवावर शिक्षण पूर्ण होताच स्वत:चे 'विवेक मुद्रणालय' उभे केले. छपाई तंत्राच्या बदलत्या स्वरुपासोबत, ठोकळे जुळवणी, ऑफसेट प्रिंटींग ते आज डिजीटल प्रिंटींग असा शिवाजीरावाचा नव तंत्रासोबत जुळवून घेत
जीवन प्रवास राहिला आहे. संयुक्त कुटुंब पध्दतीत वावरत भावा-बहिणींना सोबत घेवून त्यांचे जीवन मार्गक्रमण चालू आहे. संघ विचाराच्या सान्निध्यातली जडणघडण व वैचारिक अधिष्ठाणामुळे त्यांचा विविध सामाजिक व सांस्कृतिक चळवळीशीही खूप जवळचा संबंध राहिला आहे. योग, प्राणायाम, रक्तदान आदि चळवळीत सक्रीय सहभाग घेत त्यांनी आजपर्यंत रक्तदानाचं पाव शतक पूर्ण केलं आहे.
सांसारिकदृष्टया समृध्द व समाधानी जीवन जगताना आज त्यांची दोन मुले व सूनबाई शासकीय सेवेत कार्यरत आहेत. मित्र परिवाराचा कायम जिव्हाळा त्यांना लाभला आहे. पत्रकारितेत त्यांना सहकारी आपुलकीने 'आजोबा' हे संबोधन वापरतात. हा त्यांच्या पत्रकारितेचा सन्मानच नव्हे काय !
आम्हा मित्र परिवारातल्या या संयमी व शांत स्वभावी व्यक्तिमत्वाचा १२ फेब्राुवारी २०२३ रोजी हिरक महोत्सवी वाढदिवस ! त्या निमित्ताने शिवाजीराव कोनापुरे यांना शतायुषी आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी मनस्वी सदिच्छा....
एकनाथ डुमणे सचिव,मायबोली मराठी परिषद मुखेड

0 Comments