Header Ads Widget

हिमायतनगर शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या दिशेने प्रशासनाचे मोठे पाऊल नगरपंचायत व पोलीस प्रशासनाची संयुक्त धडक कारवाई

     नागोराव शिंदे  -
हिमायतनगर.  शहर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका तसेच पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगरपंचायत व हिमायतनगर पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या धडक कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे
शहरातील मुख्य मार्ग, बसस्थानक परिसर, बाजारपेठ, चौक तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विविध ठिकाणी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली. रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली दुकाने, टपऱ्या, हातगाड्या, शेड, फलक तसेच इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. काही ठिकाणी संबंधितांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सांगण्यात आले, तर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाने थेट कारवाई केली.
या मोहिमेत हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक केंद्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते. तसेच नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई यशस्वीपणे पार पाडली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गेल्या काही महिन्यांपासून शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठ परिसरात वाढलेल्या

अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते, तसेच आपत्कालीन सेवा आणि मोठ्या वाहनांच्या हालचालींनाही अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही विशेष मोहीम हाती घेतली.कारवाईनंतर मुख्य रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीची कोंडी कमी झाली असून नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी सार्वजनिक रस्ते व जागांवर पुन्हा अतिक्रमण करू नये, अन्यथा पुढील काळात अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.हिमायतनगर शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या संयुक्त कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

शहरातील नागरिकांनीही प्रशासनाच्या या उपक्रमाला सहकार्य करून सार्वजनिक रस्ते व जागा मोकळ्या ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या धडक मोहिमेमुळे हिमायतनगर शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याची भावना हिमायतनगर येथील सुजान नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

Post a Comment

0 Comments