Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यात आशासेविका भरती गुलदस्त्यात वरिष्ठांच्या शासकीय परिपत्रकाला केराची टोपलीदोन वर्षा पासून इंदिरानगर व वडगाव ज. च्या आशा सेविका भरती प्रलंबित

नागोराव शिदे पळसपुरकर 

हिमायतनगर. तालुक्यात २०२४ मधील आशा सेविका भरती प्रक्रिया ही वादाच्या भोवऱ्यात अडकली असून अद्यापही अनेक गावातील आशा सेविका निवड करणे जिल्हा आरोग्य अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून कोणतीही योग्य प्रक्रिया करण्यात आली नाही.त्यामुळे अनेक गावातील आशा सेविका यांची पदे रिक्त असून १३ जुन २०२५ च्या नवीन शासकीय निर्णयानुसार पूर्वीचे सर्व परिपत्रके अधिक्रमित केलेले असतानाही जुन्या पद्धतीने भरती होत असल्याचा आरोप होताना दिसून येत आहे. इतकेच नाही तर या भरती प्रक्रियेमध्ये वरिष्ठांच्या शासकीय परिपत्रकाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.यामुळे हिमायतनगर तालुक्यात आशा सेविका भरती प्रक्रिया हा मुद्दा तापलेला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सरसम व चिंचोर्डी या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या अनेक गावात लोकसंख्येच्या आधारावर आशा सेविका भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.पण अद्यापही सरसम अंतर्गत असलेल्या इंदिरानगर, पवना  तसेच चिंचोर्डी अंतर्गत असलेल्या वडगाव ज. ही भरती मात्र अद्यापही प्रलंबित असल्याचे आढळले आहे. यातील वडगाव ज. येथील आशा सेविका भरती प्रक्रियेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परिपत्रक काढत दि १७ सप्टेंबर २०२४ च्या ग्रामसभेत ग्रामपंचायत ठरावातुन नियमानुसार योग्य आशा सेविका निवडून तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात प्रस्ताव पाठवावा असे परिपत्रक काढले होते. पण  १७ सप्टेंबर च्या ग्रामसभेत गावातील आशा सेविका यांनी गोंधळ घालत ही ग्रामसभा धुडकावून लावली. यामुळे कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही.तब्बल तीन वर्षापासून ही प्रक्रिया प्रलंबित आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य तो न्याय दिला नाही.पवना येथील आशा सेविका भरती ही जुन्या परिपत्रकानुसार करण्यात आली. पण इंदिरानगर व वडगाव ज.येथील प्रक्रिया मात्र अजूनही प्रलंबित आहे.त्याला मात्र कोणताही न्याय दिला जात नाही.


वडगाव ज.येथील प्रलंबित आशा सेविका भरती प्रक्रिया लवकर करावी - आरोग्यसेविका वाठोरे 

वडगाव ज.येथील आशा सेविका भरती प्रक्रिया तीन वर्षापासून प्रलंबित आहे. १७ सप्टेंबर २०२४ च्या ग्रामसभेत गावातील जुन्या आशा सेविकेने ग्रामसभेत राडा घालत आशा सेविका इंदुबाई माने यांनी भरतीत माझ्याच सुनेला घ्या अन्यथा विष प्राशन करून आम्ही सर्व कुटुंब जीव देऊ असा ड्रामा करत ग्रामसभा तहकुब केली.तेंव्हापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. याला ग्रामपंचायत प्रशासन तथा तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अद्याप कोणताही न्याय दिलेला नाही. लवकरात लवकर वडगाव ज. येथील अशा सेविका भरती प्रक्रिया पूर्ण करावी व गावाला एक सुशिक्षित योग्य अशी सेविका मिळवून द्यावी अशी मागणी वडगाव येथील आरोग्य मंदिराच्या आरोग्य सेविका वाठोरे यांनी केले आहे.
      

हिमायतनगर तालुक्यात होणार ३५ नव्या आशा सेविकांची भरती 

तालुक्यात इंदिरानगर, पवना व वडगाव ज. येथील आशा सेविका भरती प्रक्रिया मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असूनही आगामी होऊ घातलेली ३५ आशा सेविकांची भरती प्रक्रिया होणार असून ही प्रक्रिया कशी पूर्ण होईल असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.१३ जुन २०२५ च्या नवीन शासकीय निर्णयानुसार पूर्वीचे सर्व परिपत्रके अधिक्रमित केलेले असतानाही जुन्या पद्धतीने भरती होईल की अजून एकदा नव्या परिपत्रकाला केराची टोपली  दाखवली जाईल ? हे येणारा काळच सांगेन.तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी हे राजकीय दबावातून म्हणेल त्याच उमेदवाराची निवड करण्यात मशगुल असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे वरिष्ठाच्या शासकीय परिपत्रकाला केराची टोपली दाखवली जात आहे. या प्रकरणाची चौकशी होईल का ? नियमानुसार भरती प्रक्रिया होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments