हिमायतनगर तालूक्यात सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हळद पिकांचे काढून ठेवलेले ढिग भिजून नुकसान होत असून अन्य उन्हाळी ज्वारी, तिळ पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
मे महिना कडक उन्हाचा असतो. आता उन्हाळ्यात सातत्यानं पाऊस बरसत असल्याने उन्हाळ्यात पावसाळ्याचे रूपांतर झाल्या सारखे वाटत असून गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचे आक्रमण चालू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
एप्रिल, आणी मे महिन्यात लग्नाच्या तिथी तारखा असल्याने लग्न सराईची धुम सुरू आहे.
लग्न समारंभावर अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाल्याने, वधू पिता, वर पिता चिंताग्रस्त झाले आहेत. तर वर्हाडी मंडळीची ही मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खऱ्या अर्थानं उन्हाळी उदिम करण्याचे हे दिवस आहेत. परंतू शेतात पाणीच पाणी, चिखल झाला असून खरीपाची पेरणी हरणाच्या गतीने जवळ येत असताना शेती मशागतीची कामे केव्हा होतील याचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
गेल्या काही वर्षांपासून या भागात मोसमी पाऊस बर्यापैकी कोसळत असल्याने उन्हाळी हंगामी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. या भागात सिंचनाच्या कुठल्याही सोयी नाहीत. परंतू या भागातील शेतकरी विहीर व कुपनलीकाच्या माध्यमातून शेती पाणीदार करण्याचा प्रयत्न करतात. हळद पिकांची लागवड मोठ्याप्रमाणात केली गेली. आणी हळद काढणीला आली असल्याने हळद काढून ढिग मारून ठेवलेले आहेत.
निसर्गाने अवकृपा केली असल्याने वरून फारी झाकून ठेवली तरी जमिनीतून पाणी वाहत असल्याने हळदीचे ढिग भिजून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या अर्थिक अडचणीत सापडला असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अर्थिक मदत करावी. अशी मागणी वसंतराव वानखेडे, नागोराव शिंदे , मारोतराव पवार, राजू वानखेडे, अनिल गायकवाड, बंडू शिंदे,
आनंदराव सुर्यवंशी, गंगाराम विडूळकर, गणेश सुर्यवंशी, रघुनाथ सुर्यवंशी, अरविंद वानखेडे, नितू पाटील वानखेडे, लक्ष्मण मांजरे, दिगांबर बोंबिलवार, गजानन वानखेडे, पांडुरंग वानखेडे, शिवाजी वानखेडे, वामनराव देवसरकर, दिगांबर कोंमलवार, आदिंसह अनेक शेतकऱ्यांनी तालूका दंडाधिकार्यामार्फत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे कडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.

0 Comments