Header Ads Widget

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार !!

      नागोराव शिंदे -
हिमायतनगर. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर हे उद्या, रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी हिमायतनगर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. 

या दौऱ्यात त्यांच्यासमवेत हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर उपस्थित राहणार असून, रुग्णालयाची पाहणी, आरोग्य सुविधांचा आढावा आणि रुग्णालय समितीची बैठक घेण्यात येणार आहे.

प्राप्त दौरा कार्यक्रमानुसार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून मोटारीने आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्यासमवेत हिमायतनगरकडे प्रयाण करतील. सकाळी ९ वाजता हिमायतनगर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे आगमन होणार आहे 

यावेळी रुग्णालयातील आरोग्य सेवा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, डॉक्टर व कर्मचारी व्यवस्था, औषधसाठा तसेच रुग्णांच्या अडचणी यासंदर्भात आढावा बैठक आणि रुग्णालय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

त्यानंतर सकाळी ९.३० वाजता हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी व दरेगाव तांडा येथील दुष्काळग्रस्त क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतीपिकांचे नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

सकाळी १० वाजता हिमायतनगर येथून मोटारीने नांदेड येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाकडे प्रयाण होणार आहे. सकाळी ११.३० वाजता जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आगमन झाल्यानंतर तेथील आरोग्य सुविधांचा आढावा आणि रुग्णालय समितीची बैठक होणार आहे.

दुपारी १२ वाजता नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कार्यरत असलेल्या विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य संवाद साधण्यात येणार आहे.

आरोग्यमंत्री यांच्या या दौऱ्यामुळे हिमायतनगर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा प्रश्न, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री, रिक्त पदे आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

त्यामुळे या दौऱ्यात हिमायतनगरच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात कोणते निर्णय होतात आणि रुग्णालयाच्या विकासासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध होतात, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments